औषध महानियंत्रकांनी सीरम संस्थेने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास रविवारी परवानगी दिली. यामुळे आता सर्वांच्या नजरा लसीकरण मोहीम कधी सुरु होणार याकडे लागल्या आहेत. दरम्यान करोना लस उपलब्ध झाल्यानंतर त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचीही चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.

“केंद्र सरकारने रिटेलमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली तर करोनाची लस १००० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर दुसरीकडे सरकारला आपण हीच लस २०० रुपयांमध्ये देत असल्याचंही,” त्यांनी सांगितलं आहे. सीरम केंद्र सरकारला १० कोटी करोना लसीचे डोस देणार आहे. केंद्र सरकारला प्रत्येक डोससाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. “यानंतर टेंडर काढले जातील आणि किंमतीतही बदल होतील,” अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन मर्यादित वापरास अंतिम मंजुरी; आता लसीकरणाची प्रतीक्षा

“पण मला एक स्पष्ट करायचं आहे की, जे काही आम्ही सरकारला देणार आहोत ते लोकांना मोफत दिलं जाणार आहे. तर जेव्हा आम्ही खासगी मार्केटमध्ये याची विक्री करु तेव्हा प्रत्येक डोसची किंमत १००० रुपये इतकी असेल,” असं अदर पुनावाला यांनी सांगितलं. लसला बूस्टर डोसची आवश्यकता असल्याने याची एकूण किंमत २००० असेल.

लसमान्यतेचे निकष जाहीर करा!

सीरमकडे आता पाच कोटी करोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. अदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुढील सात ते दहा दिवसांत सर्व औपचारिकता पूर्ण होतील आणि आम्ही एका महिन्यात सात ते आठ कोटी लसींची पुरवठा करण्यासाठी निर्मिती करु”.

पुढे त्यांनी सांगितलं की, “आम्ही करोना लसीची निर्यात किंवा खासगी मार्केटमध्ये विक्री करु शकत नाही. केंद्र सरकारने आम्हाला तसं सांगितलं असून आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावी लागणार आहे. अनेक महत्वाच्या लोकांना लस देणं त्यांचं प्राधान्य असून आम्हीदेखील त्यांच्या निर्णयाचा आदर करतो”.