ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. या आधी जुलैमध्ये ही लस १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तींमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांत सिद्ध झाले होते. आता त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.

‘ऑक्सफर्ड’ची करोना प्रतिबंधक लस लवकर बाजारात येऊन आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील मळभ दूर होण्याची आशा वाढली आहे. ऑक्सफर्ड लशीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का ही कंपनी करणार आहे.

अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने म्हटले आहे, की प्रतिकारशक्तीतील वाढ तरुण व ज्येष्ठांमध्ये सारखीच असून ज्येष्ठांमध्ये लशीचे काही किरकोळ दुष्परिणाम दिसण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे ही लस सर्व वयोगटांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. ‘एझेडडी १२२२’ ही लस सुरक्षित असल्याचे हे पुरावे अलीकडेच हाती आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेन्का लशीला नियामक संस्थेची परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. पीफायझर आणि बायोएनटी टेक यांच्या लशीही आघाडीवर आहेत. वयपरत्वे प्रतिकारशक्ती कमी होते असे म्हटले जाते, पण ऑक्सफर्ड लशीचा ज्येष्ठांमध्येही चांगला परिणाम दिसून आला. करोनाविरोधात त्यांची प्रतिकारशक्ती वाढली आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले, की ही लस तयार झाली असे म्हणता येणार नाही, पण २०२१च्या सुरुवातीलाच ती सज्ज होईल. या वर्षी काही लोकांना ही लस मिळणार का, या प्रश्नावर ‘बीबीसी’ बोलताना ते म्हणाले, ‘‘ती शक्यता नाकारता येत नाही, पण सध्या तरी ती मुख्य अपेक्षा नाही. लसनिर्मितीचा कार्यक्रम प्रगतिपथावर आहे, पण पूर्ण झालेला नाही.’’

ज्येष्ठ व्यक्तींमध्ये या लशीनंतर निर्माण होणाऱ्या प्रतिकार क्षमतेच्या चाचण्या घेण्यात आल्या. १८ ते ५५ वयोगटात ही लस चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करू शकते, या जुलैतील निष्कर्षांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लशीच्या चाचण्यांची माहिती लवकरच वैद्यकीय नियतकालिकात दिली जाणार असल्याचे ‘फायनान्शियल टाइम्स’ने म्हटले आहे.

अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने या लशीच्या उत्पादन आणि पुरवठय़ासाठी अनेक देश व  कंपन्यांशी करार केला असून, या लशीच्या अंतिम टप्प्यातील निष्कर्षांची सगळेच वाट पाहात आहेत. अमेरिकेत औषध नियंत्रकांच्या परवानगीने या लशीच्या प्रायोगिक चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

लस कशी तयार केली?

सर्दीच्या विषाणूपासून ऑक्सफर्डची लस तयार करण्यात आली असून त्यात जनुकीय पद्धतींचा वापर केला आहे. सर्दीच्या विषाणूत काही बदल करून त्यात करोनाच्या विषाणूतील घातक प्रथिनाचे गुणधर्म मिसळण्यात आले आहेत. या लशीचे नाव ‘एझेडडी १२२२’ किंवा ‘सीएचएडीओएक्स १ एन सीओव्ही’ असे आहे. चिंपाझीतील सर्दीचे विषाणू यात जनुकीय बदल करून वापरण्यात आले आहेत.

लशीचा पुरवठा लवकरच

‘द सन’ या वृत्तपत्र बातमीनुसार लंडन रुग्णालयास ऑक्सफर्ड – अ‍ॅस्ट्राझेन्का लशीचा पहिला टप्पा स्वीकारण्यास सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. आरोग्यमंत्री हॅनकॉक यांनीही याच वर्षी लस मिळण्याची शक्यता नाकारलेली नाही.