ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले. या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता थोडेच टप्पे बाकी आहेत.

लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्डशी करार केला होता. त्यामुळे ही लस पुण्यातील प्रकल्पात उत्पादित करण्यात येणार आहे. या लशीची खरेदी बहुतांश सरकारकडून केली जाण्याची शक्यता असून लसीकरण कार्यक्रमात ती सरकारकडून मोफत दिली जाईल. लशीच्या किमतीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांना लस देणार आहोत. त्यामुळे त्या लशीची किंमत एका डोसला एक हजार रुपये ठेवली जाईल.  या लशीच्या मानवी चाचण्या भारतात घेण्याची जबाबदारी सीरम इन्स्टिटय़ूटवर टाकण्यात आली आहे. सीरमकडून ४ ते ५ हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये केल्या जाणार आहेत.