नौदलाच्या आयएनएस निरीक्षक युद्धनौकेवर झालेल्या ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटात तीन नौसैनिक जखमी झाले असून, यातील एका नौसैनिकाला आपला पाय गमवावा लागला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आयएनएस निरीक्षकवर हा स्फोट १६ एप्रिल रोजी झाला होता. मात्र, नौदलाकडून याबाबत वाच्यता करण्यात आलेली नव्हती. अखेर आज या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
पाणबुडे वापरतात ते ऑक्सिजनचे सिलिंडर रीफिलींगचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. नौदलाच्या इतिहासात आतापर्यंत असा स्फोट केव्हाच झाला नव्हता. नौसैनिक युद्धनौकेवर काम करत असतानाच हा स्फोट झाला. यामुळे तीन जण जखमी झाले. जखमींपैकी एकाच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्रिवेंद्रम येथील लष्कराच्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. युद्धनौका मुंबईहून विशाखापट्टणमला जात होती.