इंद्राणी मुखर्जीची तपास अधिकाऱ्यांना माहिती

पीटीआय, नवी दिल्ली

आयएनएक्स मीडियाला परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (एफआयपीबी) मंजुरी देण्याच्या मोबदल्यात आपला मुलगा कार्ती याच्या उद्योगाला ‘मदत करावी’ आणि परदेशात पैसे जमा करावेत असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आपल्याला म्हटले होते, असे इंद्राणी मुखर्जी यांनी या कंपनीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.

मुखर्जी यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) त्यांचे निवेदन नोंदवले आणि आपण व आपले पती पीटर मुखर्जी यांनी चिदम्बरम यांची दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याचे सांगितले. पी. चिदम्बरम व कार्ती या दोघांनीही हे आरोप नाकारले होते.

पीटर याने संभाषण सुरू करताना आयएनएक्स मीडियाने थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणण्यासाठी केलेल्या अर्जाचा संदर्भ दिला आणि अर्जाची प्रत चिदम्बरम यांना दिली. हा मुद्दा समजून घेतल्यानंतर चिदम्बरम यांनी एफआयपीबीच्या मंजुरीच्या मोबदल्यात त्यांचा मुलगा कार्ती याच्या उद्योगात त्याला मदत करण्यास आणि शक्यतो परदेशातील खात्यांमध्ये पैसा जमा करण्यास पीटरला सांगितले, असे इंद्राणी यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे नोंदवलेल्या निवेदनात सांगितले होते.

मुखर्जी दाम्पत्य हे आयएनएक्स मीडिया समूहाचे प्रवर्तक होते आणि आपली मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याच्या आरोपाखाली सध्या ते कैदेत आहेत.

एफआयपीबीच्या मंजुरीसाठी केलेल्या विनंतीमध्ये कथित अनियमितता असल्याचे २००८ साली आम्हाला कळले, तेव्हा आपण हा मुद्दा ‘निस्तरण्यासाठी’ पी. चिदम्बरम यांना भेटण्याचा निर्णय पीटरने घेतला, असे इंद्राणी यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले होते. नियमांचे कथित उल्लंघन आणि एफआयपीबीशी संबंधित मुद्दे कार्ती चिदम्बरम याच्या मदतीने सोडविले जाऊ शकतात, असेही पीटरने सांगितले होते. नंतर या दोघांनी कार्ती याची दिल्लीतीलहॉटेलमध्ये भेट घेतली, असा इंद्राणी यांचा दावा आहे.

ऑगस्टा वेस्टलॅण्डप्रकरणी रतुल पुरी शरण येण्यास तयार

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळा आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आपण शरण येण्यास तयार आहोत, असा अर्ज उद्योगपती रतुल पुरी याने गुरुवारी दिल्ली न्यायालयात केला आहे. बँक फसवणूकप्रकरणी रतुल पुरी याला अटक करण्यात आली आहे. रतुल पुरी हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा असून त्याने विशेष न्यायाधीश अरविंदकुमार यांच्यासमोर याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी न्यायालयाने बुधवारी त्याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले अजामीनपात्र वॉरण्ट रद्द करण्यास नकार दिला होता. रतुल पुरी बँक फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात आहे. पुरी याला न्यायालयात सादर करण्याची अनुमती द्यावी म्हणजे त्याला शरण येता येईल, असा अर्ज त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे.