नरेंद्र मोदी हे समाजात दुही निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असून, गुजरातचा विकास अतिरंजित पद्धतीने मांडला जात असल्याचा आरोप अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. मोदी आणि भाजपवर चौफेर टीका करताना आगामी निवडणुकीत जनता पुन्हा एकदा भाजपला धडा शिकवेल, असे भाकीतही वर्तवले.
समान नागरी कायदा, अयोध्या, कलम ३७० रद्द करणे हे मुद्दे भाजप पुन्हा उकरून काढत असल्याचा आरोपही केला. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने पुढे केल्यास काँग्रेसवर काय परिणाम होईल यावर थेट उत्तर देण्याचे चिदम्बरम यांनी टाळले. आम्ही व्यक्तिगत पातळीवर नव्हे तर भाजपशी वैचारिक मुकाबला करणार आहोत. मोदींना प्रचारप्रमुख करताच भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात बंडाळी माजली होती हे सांगताना लालकृष्ण अडवाणींच्या राजीनामानाटय़ाचा त्यांनी संदर्भ दिला. गुजरातमध्ये मोदी जे विकासाचे दावे करत आहेत त्यात अतिशयोक्ती असून देशभर त्याचे प्रारूप चालणार नाही, असा दावा चिदम्बरम यांनी केला. त्याच्या काही सकारात्मक बाबी असल्या तरी मोठा वर्ग विकासापासून वंचित राहिल्याची आठवण चिदम्बरम यांनी करून दिली. त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट केले.