लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेला राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी अपेक्षेप्रमाणे एकमताने फेटाळला. यावेळी बोलताना माजी वित्त मंत्री पी. चिदंबरम म्हणाले की, राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये, तसे केल्यास दक्षिण भारतातील काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील. शनिवारी झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सर्व काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. काँग्रेसला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे कार्यकारिणीतील सदस्यांचे मत आहे. त्यामुळे या सदस्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाची पुनर्रचना करण्यास सांगितले असून तसा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.

नेत्यांच्या विरोधानंतरही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतरही राहुल यांनी कार्यकारिणीने फेरविचार करण्यास सांगितल्याचे समजते. राहुल यांचा प्रस्ताव स्वीकारला तर पक्षाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे ही मोठी अडचण काँग्रेससमोर आहे.

राहुल गांधी आपला निर्णय मागे घेतील याची शक्यता फारच कमी आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यापलीकडचा माणूस हवा. मी काँग्रेससाठी सैनिकासारखं, एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत राहीन, असे वक्तव्यही राहुल गांधींनी बैठकीत केल्याचे समोर आले आहे.