तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष इलनगोवन आणि कारती चिदम्बरम यांच्यात गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या वादात आता माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी उडी घेतली असून त्यांनी इलनगोवन यांनाच थेट आव्हान दिले आहे. आपल्या सहा समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीने त्यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी पी. चिदम्बरम यांनी केली आहे.
इलनगोवन यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून चिदम्बरम यांनी अद्याप कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप केला नव्हता. त्यामुळे या वेळी त्यांनी दिलेल्या थेट आव्हानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांनी गेल्या महिन्यात पक्षाला रामराम केला तेव्हा इलनगोवन समर्थकांनी म्हटले होते की, जेव्हा एखादा नेता पक्षाला रामराम करतो तेव्हा ते काँग्रेससाठी तारणहार ठरते. त्यानंतर चिदम्बरम आणि इलनगोवन यांच्यातील तिढा वाढतच गेला आहे.
त्यानंतर चिदम्बरम यांच्या समर्थकांनी इलनगोवन यांच्या निषेधाचे फलक लावले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही इलनगोवन यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.