पी. चिदम्बरम यांची टीका

भारताच्या आर्थिक वाढीला भाजप सरकारने अनुकूल वातावरण निर्माण केलेले नाही, नोटाबंदी व जीएसटी यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदम्बरम यांनी येथे केली.

ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिटय़ूटमध्ये त्यांनी ‘अ‍ॅन इमर्जिग पॉवर एंगेजेस द वर्ल्ड – इंडिया अँड ऑस्ट्रेलिया’ या विषयावर बोलताना सांगितले, की सध्याचे आर्थिक वातावरण हे १९९१ किंवा २००४ प्रमाणे सुधारणा राबवण्यास अनुकूल नाही व सरकारने यात फार निराशा केली आहे. काही बाबतीत सरकारने भलत्याच मुद्दय़ांवर भर देऊन लक्ष विचलित केले आहे, तर दुसरीकडे जे आर्थिक निर्णय घेतले गेले त्यांचे भयनाक परिणाम दिसू लागले आहेत. यातील काही बाबी कायद्यातील त्रुटींच्या असून या सगळ्या प्रकारास भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे. प्रश्नचिन्हांकित कृती व शब्द, घातक मौन यातून आंतरधर्मीय विवाह, मांस विक्री व सेवन, पोशाखाबाबतचे सांस्कृतिक निकष, हिंदी भाषेचे अवडंबर, राष्ट्रवाद, मातृभूमीच्या  प्रेमाखातर घोषणाबाजी, समान नागरी कायदा व काश्मीरला स्वतंत्र दर्जा हे विषय आणखी चिघळवले गेले आहेत.

नोटाबंदी हा तर घोटाळा-शौरी

नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था मंदावली असा आरोप माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी केला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक घोळ होता अशी टीका त्यांनी एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. नोटाबंदीने अनेकांना आपला काळापैसा पांढरा करणे शक्य झाल्याचे शौरी यांनी सांगितले. सध्याचे केंद्र सरकार केवळ अडीच व्यक्तींचे आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली.