काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही बुलेट ट्रेन नोटाबंदीसारखीच आहे. मार्गात येणाऱ्या लोकांना ती चिरडून पुढे जाईल, असे ते म्हणाले. बुलेट ट्रेनसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तेच रेल्वे सुरक्षेवर करा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीत आतापर्यंत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

रेल्वेने बुलेट ट्रेनसारख्या महागड्या प्रकल्पावर काम करण्यापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करून पायाभूत सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. रेल्वे सुरक्षा, पायाभूत सोईसुविधांवर खर्च करायला हवा, असे चिदंबरम म्हणाले. बुलेट ट्रेन सामान्यांसाठी नाही. तर ती उच्च वर्गातील लोकांची अहंकारी यात्रा असेल, असा हल्लाही त्यांनी चढवला.

याआधी भाजपचा सहकारी पक्ष शिवसेनेनेही केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून रेल्वेच्या सुरक्षेवर भर द्यायला हवा, असे म्हटले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बुलेट ट्रेन प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबईत एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज दिला. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते.