देशात करोनाचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या महाराष्ट्राला करोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाला असून अनेक लसीकरण केंद्र लस नसल्यामुळे ठप्प झालीत. त्यावर महाराष्ट्र सरकार ढिसाळपणे काम करत असून त्यांच्या उदासिनतेमुळे करोना व्हायरसविरोधी लढण्याच्या देशाच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याचा घणाघात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला होता. आता त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काही आकडेवारीद्वारे हर्षवर्धन यांच्यावर पलटवार केला आहे.

“करोनाच्या प्रसारासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला लक्ष्य केलं जात आहे. देशाच्या आरोग्य मंत्र्यांना एका आरशासमोर उभं राहून विचारायला हवं की केंद्र सरकारने खरंच महाराष्ट्राल जितकी गरज आहे तितका लसपुरवठा केला आहे का? लसीकरण कार्यक्रमातील संपूर्ण गडबडीसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, त्यात लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा न करण्याचाही समावेश होतो”, अशी जोरदार टीका चिदंबरम यांनी केली.  शिवाय, “८० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण महाराष्ट्राने केलं आहे, जवळपास २० राज्ये महाराष्ट्रापेक्षा मागे आहेत. वरीष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्यामध्येही महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी आहे, आणि ही सर्व माहिती आरोग्य मंत्र्यांच्याच विधानातून मिळाली”, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्र सरकार ढिसाळपणे काम करत असून करोना व्हायरसविरोधी लढाईत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची चालढकल सुरू आहे. करोनावरील लसीच्या तुटवड्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोप निव्वळ खोटे आहेत. महाराष्ट्र सरकार ढिसाळपणे काम करत असून या उदासिन भूमिकेमुळे करोना व्हायरसविरोधातील लढाईत सुरू प्रयत्नांना धक्का बसला आहे, असा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला होता. त्यावर चिदंबरम यांनी पलटवार केला आहे.