नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक फटके बसले असून त्यात लोकांचे रोजगार गेले, उद्योग बंद पडले व आर्थिक विकास दर खालावला, अशी टीका माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केली आहे. नोटाबंदीनंतर पाचशे व हजाराच्या ९९.३ टक्के बाद नोटा परत बँकिंग व्यवस्थेत आल्याच्या रिझर्व  बँकेच्या अंतिम निष्कर्षांनंतर त्यांनी सरकारला धारेवर धरले.

ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी म्हटले आहे की, ‘नोटाबंदीचा जो तपशील रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केला आहे तो बघितला तर केवळ १३००० कोटी रूपयांचे निश्चलनीकरण झाले असून देशाला त्या बदल्यात खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर दीड टक्क्य़ांनी कमी झाला असून त्यातच वर्षांला २.२५ लाख कोटींचा फटका बसला आहे. नोटाबंदीच्या काळात जो गोंधळ झाला त्यामुळे देशात १०० लोक प्राणास मुकले असून १५ कोटी रोजंदारी कामगारांची रोजीरोटी गेली आहे. अनेक लघु उद्योग बंद पडले असून लाखो रोजगार गेले आहेत. १५.४२ लाख कोटींपैकी १३००० कोटी रूपये वगळता प्रत्येक रूपया पुन्हा रिझव्‍‌र्ह बँकेकडे आला आहे. नोटाबंदीनंतर तीन लाख कोटी परत येतील व काळा पैसा बाहेर आल्याने फायदा होईल असे कोण म्हणाले होते ते विसरू नका. जे १३ हजार कोटी परत आले नाहीत ते नेपाळ व भूतानमधील असावेत किंवा त्यातील काही रक्कम नष्ट केली असावी अशी शंका वाटते.’

पाचशे व एक हजाराच्या ९९.३ टक्के बाद नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या असे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. त्यामुळे फार थोडा पैसा अर्थव्यवस्थेच्या बाहेर राहिला. सरकारने मात्र यामुळे काळा पैसा व भ्रष्टाचार कमी होईल असा दावा केला होता.