गेल्या २४ तासांपासून चिदंबरम यांची झोप उडाली आहे हे कपिल सिब्बल यांनी सीबीआय कोर्टाला सांगितले. इतकंच नाही तर त्यांनी चिदंबरम यांना त्रास देणं सुरु आहे असंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. सीबीआयने रात्री सांगितलं की चिदंबरम यांची आम्ही चौकशी करतो आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांनी चिदंबरम यांना फक्त १२ प्रश्न विचारले होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चिदंबरम यांनी दिली. आता जे पश्न विचारले जात आहेत त्याचा चिदंबरम यांच्याशी काहीही घेणंदेणं नाही असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

चिदंबरम चौकशीला सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र हे वास्तव नाही चिदंबरम यांनी चौकशीला कायमच सहकार्य केलं आहे. त्यांची २०१७ नंतर चौकशी झालेली नाही. त्याआधी झालेल्या चौकशीला त्यांनी सहकार्य केलं आहे. ते इतकेच दोषी असतील तर त्यांना आधी का बोलवण्यात आलं नाही? पी चिदंबरम यांच्या मुलावर जे आरोप झाले तेव्हा त्यालाही अटक करण्यात आली. मात्र त्याला जामीन देण्यात आला. आता चिदंबरम यांना जामीन का दिला जात नाही? असेही सिब्बल यांनी विचारले.

कपिल सिब्बल यांच्याप्रमाणेच अभिषेक मनु सिंघवी यांनीही चिदंबरम यांची बाजू मांडली. चिदंबरम तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जातंय मात्र ते खोटं आहे. तपासयंत्रणांनी पाच-सहा वेळा फोन केला आणि तो चिदंबरम यांनी घेतलाच नाही तर सहकार्य केलं नाही असं म्हणता येईल. मात्र एकदा फोन उचलला गेला नाही आणि चिदंबरम यांच्या घरुन तपास यंत्रणांचे अधिकारी निघून गेले तर त्याला सहकार्य केलं नाही असं कसं म्हणता येईल असा प्रश्न सिंघवी यांनी उपस्थित केला. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणातले पुरावे तपासले जात नाहीत यांना काहीतरी वेगळं करायचं आहे असाही आरोप सिंघवी यांनी केला.