नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी बुधवारी जामीन मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

या प्रकरणात १९ सप्टेंबपर्यंत १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या ५ सप्टेंबरच्या आदेशालाही चिदम्बरम यांनी आव्हान दिले आहे. ७३ वर्षांच्या या काँग्रेस नेत्याला सीबीआयने २१ ऑगस्टला अटक केली होती.

चिदम्बरम यांच्याविरुद्धचे आरोप गंभीर असल्याचे आढल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मंजूर करण्यात येत असल्याचे कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. चिदम्बरम यांचे पद आणि दबदबा यामुळे ते तपासावर प्रभाव टाकू शकतात, अशी सीबीआयला भीती असल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते

चिदम्बरम यांना झेड दर्जाची सुरक्षा असल्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात वेगळ्या कक्षात ठेवण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले होते.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात शरण येण्याच्या चिदम्बरम यांच्या प्रस्तावावर कनिष्ठ न्यायालयाने ईडीला नोटीस जारी केली होती. आपल्याला अटकपूर्व जामीन नाकारणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या २० ऑगस्टच्या आदेशाविरुद्ध चिदम्बरम यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली होती.