सालेम, तमिळनाडू : माजी मंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम हे आता केवळ भुईला भार आहेत, त्यांचे बोलणे कुणी गांभीर्याने घेऊ नये अशी टीका तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केली.

चिदंबरम यांनी अलीकडेच असे वक्तव्य केले होते की, केंद्र सरकारने तमिळनाडू हे जम्मू काश्मीरप्रमाणे केंद्रशासित राज्य करण्याचे ठरवले तरी अद्रमुक त्याला विरोध करणार नाही.

त्यांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, चिदंबरम यांना केवळ स्वतच्या हिताची चिंता आहे त्यांना देशाशी काही देणेघेणे नाही. अनेक वर्षे केंद्रीय मंत्री राहूनही चिदंबरम यांनी कावेरी पाणी तंटय़ासह राज्याचे कुठलेही प्रश्न सोडवले नाहीत. पी. चिदंबरम यांनी कुठल्या योजना आणल्या ते सांगावे, ते किती वर्षे केंद्रात मंत्री होते. त्यांचा देशाला काय उपयोग आहे तर  काही नाही ते केवळ  भुईला भार आहेत. अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी राज्याला पुरेसा निधी दिला नाही. कावेरी प्रश्न, मुल्लपेरीयार प्रश्न, पालारची समस्या  त्यांनी सोडवली नाही. त्यांचे हेतू स्वार्थी आहेत त्यामुळे त्यांचे बोलणे कुणी गांभीर्याने घेऊ नये. लोकांनी त्यांना आधीच नाकारले आहे. चिदंबरम हे कधी सालेमला भेट देऊन लोकांशी बोलले नाहीत. मी मात्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अनेकदा येथे येऊन लोकांशी बोललो आहे.

चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने असे शब्द वापरणे योग्य नाही. केवळ ऐतिहासिक अपघाताने पलानीस्वामी मुख्यमंत्री झाले आहेत.