काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हनुमंत राव यांनी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘चिदंबरम यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळेच ते पंतप्रधान मोदींची स्तुती करत आहेत,’ असे हनुमंत राव यांनी म्हटले आहे. ‘चिदंबरम पंतप्रधान मोदींचे कौतुक करत आहेत आणि त्यांचा मुलगा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वावर टीका करतो आहे. मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानेच हे सर्व सुरू आहे,’ असे म्हणत हनुमंत राव यांनी चिदंबरम यांच्यावर कडाडून टीका केली आहे. हनुमंत राव यांची तेलंगणातून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे.

पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल ११ मार्चला जाहीर झाल्यावर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. ‘पंतप्रधान मोदींची संपूर्ण देशावर चांगली पकड आहे आणि ते देशातील सर्वाधिक प्रभाव असलेले नेते आहेत,’ असे गौरवोद्गार चिदंबरम यांनी काढले होते. ‘पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालाने पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वाधिक सामर्थ्यवान नेते असल्याचे सिद्ध केले आहे. राज्यसभेतील निवडणुकीनंतर भाजपला तिथेही बहुमत मिळेल,’ असे चिदंबरम यांनी म्हटले.

निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने असणे म्हणजे नोटाबंदीचा निर्णय लोकांना पटला आहे, असे होत नाही, असेदेखील चिदंबरम यांनी म्हटले आहे. ‘उत्तर प्रदेशातील निकालांमुळे देशाला नोटाबंदीचा निर्णय पटला आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोक या निर्णयाच्या बाजूने आहेत, असे यामुळे म्हणता येणार नाही,’ असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजपला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. उत्तर प्रदेशात भाजपने ४०३ पैकी तब्बल ३१२ जागा जिंकल्या आहेत. तर उत्तराखंडमध्ये ७० पैकी ५७ जागा जिंकत काँग्रेसची सत्ता उलथवली आहे. यासोबतच भाजपने गोव्यातदेखील सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. गोव्यात ४० पैकी १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने छोट्या पक्षांची मदत घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मणीपूरमध्येही भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.