काँग्रेस नेते पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनीच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची गरज नसल्याचे मत त्यासंबंधीच्या फाईलवर व्यक्त केले होते, असे उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी मंगळवारी लोकसभेत दिले.
लोकसभेमध्ये नियम १९३ अंतर्गत देशातील असहिष्णुतेच्या मुद्द्यावरील चर्चेला मंगळवारी पुन्हा सुरुवात झाली. या चर्चेमध्ये सहभाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सनातन संस्थेकडे बोट केले आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली. त्यावर लगेचच किरण रिजीजू यांनी उभे राहून सुप्रिया सुळे यांना उत्तर दिले. यूपीए सरकारच्या काळात पी. चिदंबरम गृहमंत्री असताना सनातन संस्थेवर बंदी घालण्याची गरज नाही, असे मत त्यांनीच फाईलवर नोंदविले होते, असे रिजीजू यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी सनातन संस्थेचा विषय काढत केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्याकडील फाईल पाहावी, अशी मागणी केली. असहिष्णुतेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच गुजरात दंगल भडकली होती. मात्र, त्यावेळी कोणीही पुरस्कार परत केले नव्हते. कारण देशातील लोकांचा अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर विश्वास होता. तो विश्वास सरकारने मिळवला पाहिजे. केवळ स्वच्छ भारत करून चालणार नाही तर तो राहण्यासाठी सुरक्षितही असला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सरकारमधील कोणताही मंत्री वादग्रस्त विधान करणार नाही, याचीही काळजी सरकारचे नेतृत्त्व करणाऱ्यांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.