देशातली करोनाची परिस्थिती आता बिकट होत चालली असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यावर आरोप केला आहे. हे दोघे त्यांची जबाबदारी नाकारत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज करोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली. या माहितीनुसार, देशात एका दिवसात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली. यानंतर चिदंबरम यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. करोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा हे एक कटू सत्य आहे. पण सरकार हे अजूनही नाकारत आहे. तामिळनाडूमध्ये ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना पहिला डोसही मिळत नाहीये आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.”

“१८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या कोणालाही लस मिळत नाही. इतर राज्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत. लोकशाहीच्या तत्वांची थट्टा सुरु आहे”.

तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोना परिस्थिती हाताळण्यावरुन मोदी सरकारला चांगलंच फटकावलं आहे.

देशाच्या प्रमुख राजकीय नेत्यांना जनतेविषयी कसलीही सहानुभूती नसल्याने केंद्र सरकारने जनतेला अपयशी ठरवलं असल्याचंही त्या म्हणाल्या.
देश सध्या मोदी सरकारच्या दुर्लक्षाच्या गर्तेत बुडत चालला आहे. करोनाची ही परिस्थिती हाताळण्यासाठी देशाला आता सक्षम आणि द्रष्ट्या नेतृत्वाची गरज आहे.
विषाणूविरुद्धची ही लढाई आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे देशाला आता एक होऊन लढावं लागेल, असंही त्या यावेळी म्हणाल्या.