पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांना खडे बोल सुनावल्यानंतर काही तास उलटण्याच्या आतच झारखंडमध्ये गोमांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली. यावरून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. मोदींनी इशारा दिला त्याच दिवशी झारखंडमध्ये असगर अन्सारीला जमावाकडून ठार मारण्यात आले. यावरून कथित गोरक्षकांच्या झुंडी पंतप्रधान मोदींना घाबरत नसल्याचे स्पष्ट होते, असे चिदंबरम यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी गोरक्षकांना इशारा दिला हे चांगलेच झाले. मात्र, हा विचार प्रत्यक्षात अंमलात कसा आणणार, याबद्दलही त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होते, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

‘श्वापदे’ देशाला यादवीकडे नेतील..

गोरक्षणाच्या नावाखाली बेफाम झुंडींनी एखाद्यावर संशय घेत त्याची थेट हत्याच करण्याच्या घटना वाढीस लागल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावरील आपले मौन गुरुवारी महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात सोडले होते. ‘गोरक्षणाच्या नावाखाली मनुष्यहत्या करणे मुळीच स्वीकारार्ह नसून, अशा रीतीने कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही’, अशा शब्दांत मोदी यांनी स्वयंघोषित गोरक्षकांना समज दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता. तसाच निषेधाचा सूर गुरुवारीही त्यांच्या भाषणात होता. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धार्मिक विद्वेषातून हरयाणातील १५ वर्षीय जुनैद खानची काही स्वयंघोषित गोरक्षकांनी नुकतीच हत्या केली. त्याच्या निषेधार्थ बुधवारी देशभर ‘नॉट इन माय नेम’ आंदोलनही झाले. या सगळ्याचा संदर्भ मोदी यांच्या बोलण्यास होता. मात्र त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम स्वयंघोषित गोरक्षकांवर झालेला नसल्याचे झारखंडमधील एका घटनेने काही तासांतच स्पष्ट झाले. झारखंडमधील रामगड जिल्ह्य़ात असगर अन्सारी या तरुणाची गोमांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने हत्या केली. असगर हा त्याच्या गाडीतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून बेभान जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा अंत झाला. मात्र, लहान मुलांचे अपहरण व हत्येच्या प्रकरणात असगरवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गोमांसाची तस्करी करणाऱ्या काहीजणांनी ही हत्या केली आहे, असे पोलिसांतील काही जणांचे म्हणणे आहे.

गोमांस नेणाऱ्या माणसाची जमावाकडून हत्या