सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली. याआधी फेटाळल्या गेलेल्या अटकपूर्व जामीनप्रकरणी चिदम्बरम यांनी केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

दिल्ली विशेष न्यायालयाचे अजय कुमार कुहार यांनी प्रथम चिदम्बरम यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. तसेच सीबीआय कोठडीत असताना  त्यांचे कुटुंबीय आणि वकील यांना त्यांची भेट घेता येईल, असेही स्पष्ट  केले. समोर आलेले पुरावे आणि परिस्थिती लक्षात घेता त्यांना कोठडी देणे योग्य आहे, असे न्यायमूर्तीनी नमूद केले होते.

न्या. भानुमती यांच्यासमोर सुनावणी?

या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यावर चिदम्बरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेची सुनावणी बुधवारीच व्हावी, हा त्यांचा प्रयत्न होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवारी होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवार २३ रोजी त्यांच्या याचिकेची सुनावणी न्या. आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील पीठात होण्याची शक्यता आहे.

भ्रष्टाचारावरून काँग्रेसचे ऐक्य!

पी. चिदम्बरम यांची पाठराखण करून भ्रष्टाचारावरून काँग्रेस एकोप्याचेच दर्शन घडवत आहे, अशी टीका भाजपने केली. ही कारवाई सूडातून होत असल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, प्रथमच खरा न्याय दिला जात आहे.

अतिथी आणि आरोपी!

चिदम्बरम यांनी बुधवारची रात्र सीबीआयच्या मुख्यालयात काढली. आठ वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री या नात्याने ज्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात विशेष अतिथी म्हणून ते आले होते त्याच वास्तूत आरोपी म्हणून ते दाखल झाले. गुरुवारी पहाटे त्यांची चौकशी सुरू केली. मात्र अनेक प्रश्नांना ते आडमुठी उत्तरे देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.