नवी दिल्ली : राफेल कराराचे गूढ सरकारला वाटते त्यापेक्षा वेगाने उलगडत असून, यात पंतप्रधान कार्यालय व संरक्षण मंत्रालय यांनी समांतर वाटाघाटी केल्याची बाब सामोरी आल्याने भाजपची पंचाईत झाली आहे, अशी टीका काँग्रेसने सोमवारी केली आहे.

‘द हिंदू’ या वृत्तपत्रात या बाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तमालिकेतील तपशिलानुसार भारत व फ्रान्स यांच्यातील राफेल कराराच्या वाटाघाटी करताना संरक्षण खरेदीची कायदेशीर प्रक्रिया डावलण्यात आल्याचे दिसून आले आहे. हा आंतर सरकारी करार करताना भ्रष्टाचार विरोधी अटी व एका खात्यातून हे पैशाचे व्यवहार करण्याची अट स्वाक्षरीच्या काही दिवस आधी रद्द करण्यात आली.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी सांगितले, की राफेल कराराचे गूढ सरकारला वाटते त्यापेक्षा अधिक वेगाने उलगडत चालले आहे. सुरुवातीला हा करार ३६ विमानांसाठी होता त्यात आताच्या सरकारने १२६ विमाने खरेदी करण्याचे मान्य करून दसॉल्ट कंपनीला मोठा फायदा दिला. पंतप्रधान कार्यालय व संरक्षण खाते यांनी या करारात समांतर वाटाघाटी केल्या, त्यातही पंतप्रधान कार्यालयाचा वरचष्मा राहिला, त्यामुळे भारताच्या वाटाघाटी पथकाने या बाबत केलेल्या प्रयत्नावर पाणी फिरवले गेले. प्रामाणिक संरक्षण खरेदी प्रक्रियेतील कलमेही सोयीनुसार बदलण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. कुठलीही सार्वभौम हमी, बँक हमी व विशिष्ट खाते नसताना मोठय़ा प्रमाणात रक्कम अग्रिमापोटी देण्यात आली.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, की मोदी यांनी सार्वभौम हमी माफ करून टाकली, भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमही काढून टाकण्यात आले, त्यामुळे चौकीदार चोर आहे हे सिद्ध झाले आहे.

अंबानींसाठी मोदींनी दरवाजा उघडला

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राफेल करारामधील भ्रष्टाचारविरोधातील कलम वगळले, असा दावा माध्यमातील एका वृत्तामध्ये करण्यात आला आहे त्या संदर्भाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. उद्योगपती अनिल अंबानी यांना भारतीय हवाई दलाकडून ३० हजार कोटी रुपयांचे कंत्राट हिरावून घेता यावे यासाठी मोदी यांनी दार खुले केल्याचा आरोपही गांधी यांनी केला. भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल कराराच्या वेळी भारत सरकारकडून अभूतपूर्व सवलतींचा वर्षांव करण्यात आला, करारावर स्वाक्षऱ्या होण्यापूर्वीच त्यामधून भ्रष्टाचारविरोधी कलम आणि एस्क्रो खात्यातून पैसे देण्याचा मुद्दा या बाबीही वगळण्यात आल्या, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिल्यानंतर गांधी यांनी मोदी यांच्यावर हल्ला चढविला. भ्रष्टाचारविरोधातील कलम वगळून चौकीदाराने स्वत:च अनिल अंबानी यांना भारतीय हवाई दलाकडून ३० हजार कोटी रुपये हिरावून घेण्यास दार उघडले, असे गांधी यांनी ट्वीट केले आहे. दरम्यान, सरकार आणि अनिल अंबानी यांनी करारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप फेटाळला आहे.