बँकांच्या नफ्यातील संपूर्ण हिस्सा हा कर्मचा-यांच्या वेतनवाढीसाठी उपयोगात आणणे शक्य नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचा-यांकडून पुकारण्यात आलेल्या दोन दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना बँकेच्या नफ्याच्या आधारे वेतनवाढ करण्याला अनेक मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचा-यांच्या वेतनाचा भाग सोडून बँकेच्या नफ्याचा बरासचा भाग अन्य काही तरतूदींसाठी खर्च करण्यात येतो हे बँक कर्मचा-यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे आवाहन पी. चिदंबरम यांनी केले आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ७८व्या स्थापना दिवस सोहळ्याला ते उपस्थित होते. दीर्घकालीन भांडवलाची तरतूद करण्यासाठी बँकांना त्यांच्या मिळकतीतील एक मोठा भाग राखून ठेवावा लागत असल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगितले. सध्या देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील २८ बँकांमध्ये ८ लाख कर्मचारी काम करत असून देशभरात या बँकांच्या ५०००० शाखा कार्यरत आहेत.