करोनाच्या महामारीनं जग वेठीस धरलं आहे. सगळे सण उत्सव बंद दाराआड साजरे करावे लागत असून, वर्षभर गणरायाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या भक्तांना यंदा गणेशाचं ना जल्लोषात स्वागत करता येणार आहे, ना नीट निरोप. करोनाचं गांर्भीय जाणून लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांनं विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव यंदा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळानं घेतलेला हा निर्णय माजी केंद्रीय अर्थ व गृहमंत्री, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनाही भावला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत एकमतानं घेण्यात आला. त्यानंतर याची घोषणा करण्यात आली.

लालबागचा राजा गणेशमंडळानं घेतलेल्या निर्णयानंतर पी. चिदंबरम यांनी ट्विट करून मंडळाचं अभिनंदन केलं आहे. “यावर्षी गणेशोत्सव साजरा न करता त्याऐवजी १२ दिवस प्लाझ्मा दान शिबीर घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल वार्षिक गणोशोत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो,” असं ट्विट करत चिदंबरम यांनी निर्णयाचं कौतुक केलं आहे.

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाच्या १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझ्मा दान शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.