News Flash

“पी.चिदंबरम यांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया

संग्रहीत

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसांनी चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर काँग्रेसकडून ‘अखेर सत्याचाच विजय झाला, सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया देण्यात आली. यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती, असा ट्विटद्वारे आरोप केला आहे.

पी. चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याबद्दल मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, निष्पक्ष सुनावणीत ते स्वतःला निर्दोष सिद्ध करतील. असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

याअगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस सरकारच्या काळात चिदंबरम गृहमंत्री असताना माझ्यावर तसेच, मोदीजी आणि अमित शाह यांच्यावर चुकीचे खटले दाखल करण्यात आले होते. अखेर आमची निर्दोष मुक्तता झाली असल्याचे म्हटले होते. तसेच, चिंदबरम यांच्या विरोधात असलेल्या खटल्यातील पुरावे आहेत, तपास सुरू आहे. सध्या प्रकरण न्यायालयात आहे, त्या ठिकाणीच यावर निर्णय होईल, असे देखील गडकरी म्हणाले होते.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 4:00 pm

Web Title: p chidambarams 106 day incarceration was vengeful vindictive rahul gandhi
Next Stories
1 कांदा स्वस्त करण्यासाठी सरकारचा नवा उपाय, साठेबाजांवर आणले काही निर्बंध
2 भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांना मिळाली बुलेट ट्रेन प्रकल्पाची कंत्राटं
3 आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही : गडकरी
Just Now!
X