भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल बी.एस.धनुआ यांनी शेजारी राष्ट्रांच्या आधुनिकीकरणाच्या वेगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते नवी दिल्लीत पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. मात्र भारतीय हवाई दल प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचंही धनुआ यांनी स्पष्ट केलं आहे.

“शेजारी राष्ट्रांकडून भारताच्या सार्वभौमत्वाला कोणताही धोका असेल तर त्याच्याशी दोन हात करायला हवाई दल सज्ज आहे. मात्र शेजारी राष्ट्रांच्या आधुनिकीकरणाचा वेग आणि सैन्यदलात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा भरणा होणं ही बाबही आपल्यासाठी चिंतेची आहे. या सर्व बाबींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.” धनुआ यांनी चीन किंवा पाकिस्तानचं नाव न घेता सुचक वक्तव्य केलं आहे.

सध्या हवाई दलाच्या खात्यात असलेल्या मिग-29, तेजस, जॅग्वार यासारख्या सर्व विमानांचा आणि हेलिकॉप्टर्सची मारक क्षमता वाढवण्याचं काम सुरु आहे. याचसोबत राफेल करारानुसार हवाई दलाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन विमानांचाही देशाला फायदाच होणार असल्याचं धनुआ यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं.