दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांना सोमवारी दिल्ली न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलीसांना दिले. त्याचबरोबर न्या. राजकुमार त्रिपाठी यांनी याप्रकरणातील पोलीस अधिकाऱयांना नोटीस पाठवून पचौरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.
पचौरी यांच्याविरोधात ‘टेरी’च्याच एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पचौरी यांना गुरुवारी समन्स धाडले होते. सप्टेंबर, २०१३ मध्ये आपण ‘टेरी’मध्ये दाखल झाल्यानंतर दोन वर्षे पचौरी यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप संबंधित महिला कर्मचाऱ्याने केला. पचौरी ई-मेल आणि मोबाइल संदेशांद्वारे आपला लैंगिक छळ करत होते, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी पचौरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.