सरकारी पुरस्कारांच्या निकषांबद्दलचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत याआधीही गेला असताना आणि पद्म पुरस्कारांच्या निवडीच्या दर्जाबद्दलही गेल्या काही वर्षांपासून चर्चेला तोंड फुटले असताना सत्तांतरानंतर चित्र बदलेल, ही अपेक्षा पद्म पुरस्कारांबाबत फोल ठरली आहे. यंदाच्या पद्म मानकऱ्यांमध्ये कला, शिक्षण, समाजसेवा आणि साहित्यात भरीव कामगिरी केलेल्या काही नामवंतांचा समावेश असला तरी या निवडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पूर्ण ठसा दिसून येतो. डॉ. विजय भटकरवगळता महाराष्ट्राची या पुरस्कारात उपेक्षा झाली असून, गुजरातचा अनुशेष मात्र भरला गेला आहे!

भाजपचे हिंदुत्ववादी राजकारण, धार्मिक पुनरुत्थानाचा प्रयत्न, दक्षिण आणि उत्तरेतील पट्टय़ातील पक्षवाढीची योजना तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप पाडण्यासाठीचे प्रयत्न यांचाही प्रभाव या निवडीवर आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारांत प्रथमच विविध धर्मपीठांच्या प्रमुखांचाही समावेश झाला आहे.

गुजरात दंगलीसंबंधात सर्वोच्च न्यायालयाचे अमॅकस क्युरी अर्थात विधिसहाय्यक म्हणून भूमिका बजावलेले आणि भाजपशी आंतरिक मैत्र असल्याचा आरोप झालेले विधिज्ञ हरीश साळवे, अलीकडे भाजपच्या राजकारणाबाबत सकारात्मक मते मांडणारे माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी, अयोध्या वादातील एक साक्षीदार जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य यांचीही निवड लक्षणीय आहे. ‘साहित्य आणि शिक्षण’ या विभागात अनेकांची सरळ वर्णी लागल्याचे दिसत आहे. २०१४च्या निवडणूक प्रचारात मोदी यांची गोड मुलाखत घेणारे रजत शर्मा यांचीही या विभागात निवड झाल्याने त्यांचा साहित्य आणि शिक्षणाशी काय संबंध, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मोदी यांच्या

स्वच्छता अभियानात बनारस येथील घाटांच्या स्वच्छतेसाठी आपली आयुष्यभराची २० लाखांची पुंजी देणारे लेखक मनु शर्मा यांचीही या विभागातच निवड झाली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांची निवड पक्षांतर्गत समन्वय साधणारी आणि प्रकाशसिंग बादल यांची निवड पक्षीय राजकारणातील ताण कमी करणारी आहे. अमिताभ बच्चन यांची निवड सार्थ असली तरी ते गुजरात पर्यटन खात्याचे सदिच्छा दूतही आहेत.

अनेक मराठी लेखक, कलावंतांची उपेक्षा झाली असून तारक मेहता, गुणवंत शहा या लेखकांसह गुजराती असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांची निवडही लक्षवेधक आहे.काही खरे मोहरेही या पुरस्काराने गौरविले गेले आहेत. सध्या नव्वदी पार केलेले सुभाषचंद्र बोस यांचे जपानमधील सहाय्यक साइशिरो मिसुमी, वयाची शंभरी पार केलेले आणि शिक्षणाचा प्रसार करणारे शिवकुमार स्वामी, गंगेच्या काठी आठ मजली भारतमाता मंदिर उभारणारे सत्यमित्रानंद गिरी यांचे कार्य या निमित्ताने लोकांसमोर आले आहे.

 

पद्म मानकऱ्यांची यादी..
पद्मविभूषण
कला : दिलीप कुमार, अमिताभ बच्चन.
राजकारण : लालकृष्ण अडवाणी, प्रकाशसिंग बादल.
सामाजिक कार्य : डॉ. डी. वीरेंद्र हेगडे.
विज्ञान व अभियांत्रिकी : प्रा. मल्लुर रामस्वामी श्रीनिवासन.
न्याय : विधिज्ञ कोट्टायन के. वेणुगोपाल.
व्यापार : करिम अल हुसैनी आगा खान (फ्रान्स).
अन्य : जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य.
पद्मभूषण
कला : शास्त्रीय गायक पं. गोकुलोत्सवजी महाराज, कर्नाटक संगीतातील गायिका सुधा रघुनाथन, चित्रपट दिग्दर्शक जाहनु बरूआ.
न्याय : विधिज्ञ हरिश साळवे.
सामाजिक कार्य : बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स.
विज्ञान : शास्त्रज्ञ विजय भटकर, डॉ. खरगसिंग वालदिया, प्रा. मंजुल भार्गव (अमेरिका).
साहित्य : स्वपन दासगुप्ता.
प्रशासन : माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी, माजी लोकसभा सचिव डॉ. सुभाष कश्यप.
वैद्यकीय : डॉ. अंबरीश मिथाल, डॉ. अशोक सेठ.
साहित्य व शिक्षण : रजत शर्मा.
अन्य : स्वामी सत्यमित्रानंद गिरी, शिवकुमार स्वामी, अमेरिकेत वेदप्रसार करणारे डेव्हिड फ्रॉले ऊर्फ वामदेश शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जपानमधील सहाय्यक साइशिरो मिसुमी.
क्रीडा : सतपाल.
पद्मश्री
वैद्यकीय : डॉ. मंजुळा अनगणी, प्रा. डॉ. योगेशकुमार चावला, जयकुमारी चिक्कला, डॉ. सरुंगबाम बिमलाकुमारी देवी, डॉ. रणदीप गुलेरिया, डॉ. राजेश कोटेचा, प्रा. अलका कृपलानी, डॉ. हर्ष कुमार, अहमदाबादचे डॉ. तेजस पटेल, डॉ. नरेंद्र प्रसाद.
विज्ञान : एस. अरुणन, डॉ. एन. प्रभाकर, डॉ. प्रल्हाद.
कला : चाचा चौधरीचा जनक प्राण कुमार शर्मा ऊर्फ प्राण (मरणोत्तर), दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, संगीतकार रवींद्र जैन, पटकथाकार प्रसून जोशी, लेखक तारक मेहता, कर्नाटक संगीतातील गायिका ए. कन्याकुमारी, लघुपट दिग्दर्शक व छायाचित्रकार नरेश बेदी, गायक राहुल जैन, तेलुगू अभिनेते कोटा श्रीनिवास राव, रंगभूमी कलावंत शेखर सेन, महेश राज सोनी.
साहित्य व शिक्षण : काश्मीरातील शैवपंथाच्या अभ्यासिका डॉ. बेट्टिना शारदा बॉमेर, गीता, महाभारतावर विपुल लेखन करणारे अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय, हास्यकवि डॉ. सुनील जोगी, डॉ. लक्ष्मीनंदन बोरा, डॉ. ग्यान चतुर्वेदी, उषाकिरण खान, कोकणी भाषा प्रचार सभेचे एन. पुरुषोत्तम मल्ल्या, गोव्यातील लेखक लॅम्बर्ट मास्करन्हास, पत्रकार रामबहाद्दूर राय, गुजराती लेखक गुणवंत शहा, लेखक मनु शर्मा.
प्रशासन : डॉ. अशोक गुलाटी, आर. वासुदेवन (मरणोत्तर).
सामाजिक कार्य : अशोक भगत, डॉ. जनक पाल्टा मॅकगिलिगन, वीरेंद्रराज मेहता.
क्रीडा : साबा अंजुम, मिताली राज, पी. व्ही. सिंधू, अरुणिमा सिन्हा.
अन्य : दिवंगत सय्यदना महम्मद बुऱ्हानुद्दिन, हुआंग बाओशेंग (चीन).