जिल्ह्य़ातील कुपल्ली येथे ज्ञानपीठ विजेते कन्नड कवी दिवंगत के.व्ही पुटप्पा यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दरोडा टाकून त्यांना मिळालेल्या पद्मभूषण व पद्मविभूषण सन्मानाची पदके चोरून नेण्यात आली. दरोडेखोरांनी सीसीटीव्हीच्या वायर्स कापून त्यांच्या स्मारकातील पदके घेऊन पोबारा केला. पुटप्पा यांचे वडिलोपार्जित घर हे त्यांचे स्मारक आहे. कन्नड भाषेत त्यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला होता.
पुटप्पा हे कुवेम्पू नावाने प्रसिद्ध होते. त्यांना १९५८ मध्ये पद्मभूषण व १९८८ मध्ये पद्मविभूषण सन्मान मिळाला होता. त्यांची ती दोन्ही पदके काचेच्या कपाटातून बेपत्ता झालेली दिसली. ती पहिल्या मजल्यावर ठेवलेली होती असे संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांना या प्रकरणी धागेदोरे सापडले असून लवकरच गुन्हेगारांना पकडण्यात येईल असे सांगण्यात आले. शिवमोग्गाचे पोलिस अधीक्षक रवी छन्नावर यांनी सांगितले की, सीसीटीव्ही चित्रण मिळाले असून त्यातून धागेदोरे हाती आले आहेत.दरोडेखोरांनी वायरी तोडण्यापूर्वीच त्यांचे चित्रण यात झालेले आहे. पोलिसांनी सांगितले की, पहारेकरी सायंकाळी साडेसात ते साडेआठ दरम्यान जेवणास गेला असताना सोमवारी रात्री हा प्रकार घडला. बाकी सर्व कलावस्तू सुरक्षित असून त्यांचे साहित्य चोरीस गेलेले नाही.