पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका लोकगीत गायकानं सुधारिक नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. मधू मन्सुरी असं झारखंडमधल्या या गायकाचं नाव आहे. यंदा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणाऱ्या मानकऱ्यांच्या यादीत मन्सुरी यांचं नाव आहे. रविवारी रांचीमध्ये सीएएच्या विरोधासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मन्सुरी सहभागी झाले होते.

झारखंडची राजधानी रांची येथे रविवारी सीएए व प्रस्तावित एनआरसीच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली, यावेळी मोठ्या प्रमाणावर विरोधक एकत्र आले होते. याठिकाणी ७१ वर्ष वय असलेल्या मन्सुरी यांनी त्यांचं लोकप्रिय गाणंही ऐकवलं. “गांव छोडाब नही, जंगल छोडाब नही, माय-माती छोडाब नही, लडाई छोडाब नही,” हे गाणं त्यांनी गायलं.

या गाण्यानंतर मन्सुरी यांनी तिथं जमलेल्या आंदोलकांना आपण त्यांच्याबरोबर असल्याचं सांगितलं. शनिवारी पद्म पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर मधू मन्सुरी प्रथमच लोकांसमोर आले ते ही सीएएला विरोध करणाऱ्या व्यासपीठावर. नंतर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मन्सुरी म्हणाले,”या लढ्याला माझा पाठिंबा आहे, पण सीएए-एनआरसी बाबत मला काही बोलायचं नाहीये. मी इथं मला मिळालेला पुरस्कार साजरा करण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलो आहे.”

एक शाम संविधान के नाम हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सीएएला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देत घटनात्मक मूल्यांना साजरं करणं हे या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. मुलांच्या चित्रकलेनं कार्यक्रमाची सुरूवात झाली. तसेच अनेक गायकांनी व कवींनीही आपली कला येथे सादर केली.