19 January 2021

News Flash

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची उचलबांगडी; प्रसून जोशी नवे अध्यक्ष

त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला.

सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी

केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदावरून शुक्रवारी पहलाज निहलानी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी प्रसिद्ध गीतकार आणि अॅडमेकर प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या आडमुठ्या आणि वादग्रस्त मार्गदर्शक तत्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्यावर नाराज होते. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या ‘उडता पंजाब’, ‘इंदू सरकार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि सध्या प्रसिद्धीच्या वाटेवर असलेल्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. गेल्याच आठवड्यात काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी त्यांनी पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. यापूर्वीही अनेक दिग्गज कलाकारांनी निहलानींच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निहलानी यांनी कधीच कलाकारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना जुमानले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अॅक्शन हिरो’ संबोधून आपल्या राजकीय निष्ठा स्पष्ट केल्या होत्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे असल्याचा आरोपही अनेकदा झाला होता. याशिवाय एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठीही आरएसएसने गजेंद्र चौहन यांचे समर्थन केल्याचं सांगण्यात येत होतं. चौहान यांच्या नियुक्तीवरूनही असाच मोठा वाद निर्माण झाला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. पहलाज निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली. १९७५ मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली. तसेच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही उडी घेतली. ९० च्या दशकात त्यांनी गोविंदाबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. पहलाज निहलानी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे बंधू आहेत.

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2017 7:33 pm

Web Title: pahlaj nihalani sacked as cbfc chief to be succeeded by prasoon joshi
Next Stories
1 राष्ट्रगीताला आणि झेंडावंदनाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवा- विनय कटियार
2 स्वातंत्र्यदिनी ८ हजार मदरशांमध्ये ‘देशभक्तीची चाचणी’
3 ‘शरद यादव त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहेत’
Just Now!
X