दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली. ही बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारीही नकार दिला. आम्ही प्रदूषण टाळण्यासाठी फटाके विक्रीवर बंदी घातली. यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता. मात्र या सगळ्या प्रकाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला. काही नेत्यांनी सोशल मीडियावर सुप्रीम कोर्टाने हिंदू विरोधी निर्णय दिला असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या. या टीकेमुळे वेदना झाल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.

ज्या लोकांनी बंदी घालण्याआधी म्हणजेच ९ ऑक्टोबरच्या आधी फटाके विकत घेतले आहेत ते फटाके उडवू शकतात. दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर काय आहे ते आम्ही तपासणार आहोत असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या फटाके विक्रीवरील बंदीचे काही लोकांनी स्वागत केले तर बहुतांश लोकांनी विरोध केला. असे असले तरीही दिल्लीतील प्रदूषण कमी व्हावे हा आमचा एकमेव उद्देश आहे असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.