भारत सरकारकडून जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने मागील काही दिवसांमध्ये अनेक अविचारी निर्णय घेतले. मात्र या निर्णयांचा परिणाम त्यांच्याच देशावर होऊ लागल्याची पाकिस्तानाला आता जाणीव होऊ लागल्याचे दिसत आहे. काश्मीर मुद्यावरून भारताबरोबर सर्व प्रकारचे व्यापारी संबंध तोडण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला महिनाभरातच आपण केलेल्या चुकांची उपरती होत असल्याचे दिसत आहे. कारण, पाकिस्तानात सध्या जाणवत असलेल्या जीवनावश्यक औषधांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून या औषधांची आयात करण्यास पाकिस्तान सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात एक आदेशही जारी केला आहे. ज्यामध्ये भारताकडून औषधांच्या आयातीस मंजुरी देण्यात आलेली आहे.वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार २०१९ मध्ये जुलै महिन्यापर्यंत पाकिस्तानने भारतीय औषधी कंपन्याकडून १ अब्ज ३६ कोटी रूपयांची औषध मागवलेली आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध तणावपूर्ण बनले होते. या हल्ल्यांनतर भारताने पाकिस्तानकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के सीमाशुल्क लावले होते. २०१७-१८ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये केवळ २.४ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. जो भारताने जगाबोरबर केलेल्या एकूण व्यापाराचा केवळ ०.३१ टक्के होता. तर द्विपक्षीय व्यापारात जवळपास ८० टक्के हिस्सा भारताच्या निर्यातीचा आहे.