भारताने हल्ला केला तर आम्ही जशास तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत असे वक्तव्य पाकिस्तानी लष्कराने प्रसारित केले आहे. पाकिस्तानच्या लष्कर आणि हवाई दलाची बैठक सोमवारी पार पडली त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि एअर चीफ मार्शल मुजाहीद अन्वर खान यांच्यात ही बैठक पार पडली. भारताने हल्ला केला तर त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असे या दोघांनी म्हटल्याचे एका ट्विटमधूनही सांगण्यात आले आहे.

भारताने आमच्यावर कोणताही हल्ला केला किंवा भारतीय हवाई दलाने आमच्या सीमेत प्रवेश केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ अशा आशयाचं एक ट्विट पोस्ट करण्यात आलं आहे. आम्हाला आमच्या तयारीवर, उत्तर देण्याच्या क्षमतेवर आणि सुसज्ज शस्त्रधारी लष्करावर पूर्ण विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात भारतीय जवानांवर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला.

या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध तणावपूर्ण आहेत. पाकिस्तानचा बदला घ्या, पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर द्या अशी मागणी भारताच्या सर्व स्तरातून होते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला होता. मात्र सोमवारी यू टर्न करत शांततेची एक संधी द्या असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. तोच पाकिस्तानी लष्करातर्फे भारताला हा इशाराच जणू देण्यात आला आहे. आता याबाबत पंतप्रधान काय भूमिका घेतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.