भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारताकडून देण्यात आलेल्या निमंत्रणाचा नवाज शरीफ यांच्याकडून स्वीकार करण्यात आला आहे. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला नवाज  शरीफ उपस्थित राहणार आहेत. यासाठी  सोमवारी सकाळी नवाज शरीफ भारतात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरीफ यांची उपस्थिती ही भारत-पाक संबंधांच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेसुद्धा शरीफ यांना ही संधी दवडू नये असा सांगत मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची शिफारस केली होती. येत्या सोमवारी नरेंद्र राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात येणार असून या समारंभाला सार्क देशांचे प्रमुख आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तसेच या शपथविधी समारंभाला शेजारील देशांमधील उच्चपदस्थ नेते आणि तीन हजारांहून अधिक निवडक निमंत्रित हजर राहणार आहेत.