पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात युद्धाची भाषा केली. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या भारताचा निर्णयामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ आहे. इम्रान खान यांनी आपल्या भाषणात भारताला लक्ष्य केले. भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आमचं लष्कर तयार आहे अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.

भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर हल्ल्याचा कट रचला आहे असा आरोप इम्रान खान यांनी केला. भारत पीओकेमध्ये काहीतरी करणार आहे. त्यासाठी ते सज्ज आहेत. पाकिस्तानी लष्कराकडे यासंबंधी खात्रीलायक माहिती आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये इम्रान खान बोलत होते. काश्मीरवरुन जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताने पीओकेवर हल्ल्याचा कट रचला आहे असे इम्रान खान म्हणाले.

भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानची लढाई एका विचारधारेविरोधात आहे. ही विचारधारा भयंकर आहे असं म्हणत त्यांनी भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताला महागात पडणार आहे. सध्या काश्मीरमध्ये काय सुरु आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. मात्र आता सगळ्या जगाचं लक्ष काश्मीरकडे लागलं आहे. आता काश्मीरमध्ये काय घडतं आहे ते पाहाच असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

आरएसएसची विचारधारा महाभयंकर आहे हे जगाला ठाऊक नाही. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री काय म्हणतात? मुस्लीम महिलांना कबरीतून बाहेर काढून बलात्कार करु. मुख्यमंत्रीपदी बसणारा माणूस असं वक्तव्य कसं काय करु शकतो? काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर महिलांबाबत कशी वक्तव्यं समोर येत आहेत ते पाहा म्हणजे यांचे विचार किती सडके आहेत हे लक्षात आहे. भारत सहिष्णू देश समजला जात होता, मात्र सध्या जी विचारधारा आणि जे सरकार सत्तेत आहे त्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे भारताचं होणार आहे असंही इम्रान खान म्हणतं आहे.