पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आपला मूळ स्वभाव कधीही सोडणार नाही. कारस्थान रचून, भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या पाकिस्तानच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही. ऑगस्ट २०१९ पासून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाच्या काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना एकत्र ठेवण्यात पाकिस्तानी लष्कर यशस्वी ठरले आहे. दोन दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा उद्देश, समन्वय साधून हल्ला करणे, हाच असतो.

केंद्र सरकारने मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले, तेव्हापासून जैश आणि लष्कर-ए-तय्यबा या दोन्ही दहशतवादी संघटनांकडून भारतावर हल्ला करण्याची कारस्थानं रचली जात आहेत. त्यांना यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ची साथ आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

जैश, लष्कर, हिजबुल आणि तालिबान या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्याच्या बैठका पार पाडल्या आहेत. या संघटनांना एकत्र आणून, दहशतवादी हल्ला घडवून आणण्यामध्ये जैशचा कमांडर मुफ्ती मोहम्मद असगर खान काश्मिरी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी तयार केलेल्या रिपोर्ट्मधून ही माहिती समोर आलीय.

इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, २७ डिसेंबर २०१९ रोजी पहिली बैठक पार पडली. जमात उद दावाचा सरचिटणीस अमीर हमजाने बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्यांची भेट घेतली. भारताविरोधात दहशतवादी हल्ले तीव्र करण्यासाठी रणनिती ठरवण्यावर त्यांच्यात या बैठकीच चर्चा झाली.

त्यानंतर तीन ते आठ जानेवारी आणि १९ जानेवारी २०२० रोजी इस्लामाबादमध्ये बैठक पार पडली. प्रतिबंधित जैश आणि लष्कर-ए-तय्यबाचे मोठे दहशतवादी या बैठकीला उपस्थित होते. सात मे ला सुद्धा इस्लामाबादमध्ये बैठक पार पडली. शस्त्रास्त्र वाटून घेणे, काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवाद्यांना मदत करण्याबद्दल चर्चा झाली. जैशच्या मुफ्ती असगर काश्मिरीच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या सर्व हल्ल्यांची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीन स्वीकारेल, असे एका बैठकीत ठरल्याचे इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे.