पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याला दोन दिवस उरले असतानाच जम्मूच्याच अखनूर भागात पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांवर तोफगोळ्यांचा जोरदार मारा तसेच गोळीबार केला. इतकेच नव्हे तर पाकिस्तानव्याप्त काश्मिरात हेरगिरीसाठी भारताने पाठविलेले ‘ड्रोन’ विमान पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला. लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमेवरील माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले असून हेरगिरीच्या आरोपांचा इन्कार केला आहे.
विशेष म्हणजे दहशतवादविरोधी लढय़ाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रशियात ऐतिहासिक सहमती दर्शवून एक आठवडाही उलटत नाही तोच पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. बुधवारी पाकिस्तानने दोनदा शस्त्रसंधीचा भंग करीत सीमारेषेवर गोळीबार केला. यात अखनूर भागातील कनचाक चौकीवर तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा जवान अंजलीकुमार जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून नेत असताना पाकिस्तानी रेंजर्सनी पुन्हा गोळीबार केला. या गोळीबाराला लष्करातर्फे चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने कनचाक भागातील भलवाल भर्थ, मालाबेला, सिदरवान या गावांवर तोफगोळे डागले. त्यात पोलीदेवी ही ४२ वर्षीय महिला ठार झाली. तर अन्य तिघे जखमी झाले. पाकिस्तानकडून या महिनाभरात शस्त्रसंधीचा आठव्यांदा भंग झाला आहे.
दरम्यान, भारताचे हेरगिरी ‘ड्रोन’ पाडल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मिरातील भिंबेर येथे महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे घेण्याचे काम हे ड्रोन करत होते, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. भारतीय लष्कराने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.