मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकी उर रेहमान लख्वी याला सोडून देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तान सरकारने अपील करावे, असे भारताने शनिवारी सांगितले.
गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, पाकिस्तानला आम्ही लख्वीच्या विरोधात पुरावे दिले होते. पाकिस्तानने ते न्यायालयाला सादर केले नाहीत त्यामुळे लख्वीची सुटका झाली आहे. पाकिस्तानने आम्ही दिलेले पुरावे वापरले नाहीत.
भारताने शुक्कवारी असे म्हटले होते की, पाकिस्तानने लख्वीला सोडून दिले ही गंभीर बाब असून त्याचा द्विपक्षीय संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पॅरिस येथे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस आलाँद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असे सांगितले की, लख्वीची सुटका ही धक्कादायक आहे. इस्रायलने शनिवारी म्हटले आहे की, २६/११ च्या हल्ल्यातील सूत्रधार लख्वी याची सुटका आश्चर्यकारक व निराशाजनक आहे व भारत- इस्रायल या दहशतवादविरोधी दोन्ही भागीदारांच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी प्रयत्नांना मोठा धक्का आहे. इस्रायलचे राजदूत डॅनियल कॅरमॉन यांनी सांगितले की, पाकिस्तानने लख्वीला सोडले यामुळे इस्रायलला धक्का बसला असून निराशा पदरी पडली आहे.
भारतात कारवाया करणार नसल्याचे वचन ?
झाकी उर रहमान लख्वी (५५) याला अखेर पाकिस्तानी न्यायालयाने जामीनावर मुक्त केले असले तरी दोनदा त्याला पुन्हा तुरुंगात डांबणाऱ्या पाकिस्तान सरकारने यावेळी मात्र राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये त्याला पुन्हा अटक करण्याचे धाडस दाखवले नाही. दोन वेळा त्याची सुटका करण्याचे आदेश तेथील न्यायालयाने दिले असतानाही पाकिस्तान सरकारने त्याला पुन्हा स्थानबद्ध केले होते पण आता मात्र आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही लख्वीला का सोडण्यात आले असावे असा प्रश्न अनेकांना पडण्यासारखा आहे. लख्वीला सोडण्याबाबत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा या संघटनेचा एक अलिखित करार झालेला असून त्यात लख्वीने भारतात दहशतवादी कारवाया पुढील बराच काळ थांबवण्याचे वचन दिले आहे.
त्याला सोडण्यामागे दुसरे एक कारण म्हणजे आता अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य माघारी जात असताना तेथे इसिस या अतिरेकी संघटनेचा उपद्रव वाढला आहे ते पाकिस्तानला मान्य नाही. पाकिस्तानी लष्कर त्यांच्यावर थेट कारवाई करू शकत नाही त्यामुळे लख्वीला हाताशी धरून अफगाणिस्तानातील इसिसच्या नांग्या ठेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व तो प्रयत्न करण्याचे काम अतिरेकी कारवायांचा मोठा अनुभव असलेल्या झाकी उर रहमान याला देण्यात आले आहे. लख्वी याने मुंबईत हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले होते व हा हल्ला करण्यात लख्वीचाच पुढाकार होता असे अमेरिकेत बंदिवासात असलेला डेव्हीड हेडली या अतिरेक्याने जाबजबाबात सांगितले होते. याशिवाय अमेरिकेने नुकतेच केलेले एक विधान महत्त्वाचे आहे ते म्हणजे भारत जर अफगाणिस्तानच्या उभारणीत सहकार्य करीत असेल तर त्यात पाकिस्तानने अडथळे आणू नयेत. इसिसने अनेक देशांत धुमाकूळ घातला असताना अमेरिकी लष्कराच्या माघारीनंतर त्यांना तेथे मोकळे रान मिळणार आहे .

झाकी उर रहमान लख्वी (वय ५५) हा लष्कर ए तय्यबाचा कमांडर असून २००८ च्या मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात तो सूत्रधार होता. त्याचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतात ओकरा जिल्ह्य़ात झाला. अमेरिकेने २००८ मध्ये त्याच्या मालमत्तेवर टाच आणली होती. लष्कर-ए-तय्यबाचा कार्यात्मक प्रमुख म्हणून तो काम पाहतो. विशेष म्हणजे अदियाला या अतिसुरक्षित तुरुंगात असतानाही तो एका मुलाचा पिता बनला आहे. लख्वीला मोकळे सोडल्याने भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.