एक अस्वस्थ करणारी घटना पाकिस्तानमधून समोर आली आहे. तेथील पोलिसाने प्रथम एका हिंदू मुलीला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून वाचविले. नंतर तिची ५० हजार रुपयांना विक्री केली. त्या मुलीला जबरदस्तीने एका अनोळखी माणसाबरोबर लग्न करावे लागले आणि नंतर तिचे धर्मपरिवर्तनदेखील करण्यात आले. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात ही घटना घडली असून, या मुलीचे नाव अनीला बागडी असे आहे. ती पाकिस्तनमधील मीरपूरमध्ये राहणारी आहे. डीएनएमधील वृत्तानुसार, आपल्याला जफर मंसुरी नावाच्या मुलाबरोबर जबरदस्तीने लग्न करावे लागल्याचे अनिलाने म्हटले आहे. आरोपी पोलिसाचे नाव साजिद काजी असे आहे. हे प्रकरण समोर येताच तपास सुरू झाला आणि साजिदला निलंबित करण्यात आले. आपले अपहरण करण्यात आले होते आणि साजिदनेच आपल्याला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून वाचविल्याचे अनिलाने सांगितले. परंतु, अनिलाच्या कुटुंबियांनी तिला घरी नेण्याचे ठरवले असता साजिदने तिला घरी पाठविण्यास नकार दिला. अनिलाला कुटुंबियांसोबत घरी पाठविण्याऐवजी साजिदने तिची विक्री केली. साजिदचा मित्र जफर याने अनिलाला खरेदी केले. हे प्रकरण समोर येताच स्थानिकांनी दबाव निर्माण केला आणि प्रशासनाला शोध करण्याचे आदेश देणे भाग पडले. हा एक कट असल्याचा तेथील हिंदू लोकांचे म्हणणे आहे. पाकिस्तान सरकारने मदत करावी असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. यामागे नक्की काहीतरी कट आहे. ही माणसे हिंदू समुदायाच्या लोकांना त्रास देऊन पळवून लाऊ इच्छितात. परंतु, आम्ही येथून जाणाऱ्यातले नाही. आमच्या कुटुंबाची आणि मुलाबाळांची मदत करण्याचे आवाहन आम्ही पाकिस्तान सरकारला करतो, असे ‘ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत’चे सदस्य रवि दवानी यांनी ‘इंडिया टुडे’शी वार्तालाप करताना सांगितले.