राजकीय महत्त्वाकांक्षेने पाकिस्तानात परतलेल्या मुशर्रफ यांना आणखी एक धक्का बसला आहे. पेशावर उच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या या माजी राष्ट्रप्रमुखांना कोणत्याही प्रकारच्या निवडणुका लढविण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे, तर अन्य एका निर्णयाद्वारे मुशर्रफ यांना पाकिस्तानात ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर तीन दिवसांपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दोस्त मोहम्मद खान यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मुशर्रफ यांचा उमेदवारीविषयक अपील अर्ज फेटाळून लावताना त्यांच्यावर निवडणुका लढविण्यास आजीवन बंदी घातली. मुशर्रफ यांनी २००७ मध्ये आणीबाणीदरम्यान संविधानाची पायमल्ली केली असल्याचे तसेच न्यायमूर्तीना स्थानबद्ध केले असल्याचे कारण या बंदीसाठी न्यायालयाने पुढे केले आहे.
मंगळवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीस सुरक्षेच्या कारणास्तव मुशर्रफ उपस्थित राहू शकले नव्हते. मुशर्रफ यांना जरी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरीही सध्या ते इस्लामाबाद येथून जवळच असलेल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये आहेत. या फार्म हाऊसलाच निम-तुरुंगाचा दर्जा देण्यात आला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मे रोजी होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 1:50 am