पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधात गुरूवारी फेडरल न्यायालयाकडून भ्रष्टाचारप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आले. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे नेते असलेल्या गिलानी यांच्यासह त्यांच्याच पक्षाच्या मखदूम अमीन फाहीम यांच्या विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. न्यायालयाने हे आदेश फेडरल इनव्हेस्टीगेटिंग एजन्सी (एफआईए) च्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानंतर दिले आहेत. गिलानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्यांच्यावर अनेक बनावट कंपन्या स्थापन करून या कंपन्यांना बेकायदेशीरित्या व्यापारी सवलती दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने यापूर्वीही गिलानी आणि फईम यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती. मात्र, या दोघांकडून या नोटीशींना उत्तर देण्यात आले नव्हते. दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना गिलानी आणि फईम यांना अटक करून १० सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे.