पाकिस्तानाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारने राजीनामा द्यावा यासाठी सरकारविरोधी दोन निषेध मेळावे घेण्यात आले असून हजारो शरीफ विरोधी कार्यकर्ते या वेळी राजधानीत या मेळाव्यांसाठी जमा झाले व त्यांनी शरीफ यांच्या १५ महिन्यांच्या सरकारला आव्हान दिले. क्रिकेटपटू व राजकारणी इमरान खान व कॅनडाचे धर्मगुरू ताहिरूल काद्री यांच्या गटांनी हे निषेध मेळावे घेऊन शरीफ यांनी राजीनामा द्यावा व गेल्या निवडणुकात अनेक गैरप्रकार झाल्याने पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली.
‘तेहरीक ए इन्साफ’ या प्रमुख विरोधी पक्षाचा नेता इमरान खान याने सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत गेल्यावर्षी झालेल्या निवडणुका आम्हाला मान्य नाहीत. आपण येथे ठिय्या देणार आहोत. नवाझ शरीफ यांच्यापुढे राजीनामा देऊन निवडणुका घेण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला लोकशाही ढासळवायाची आहे असे नाही, पण सध्या देशात लोकशाहीच नाही. खान यांनी सांगितले की, आपण तीन वाजेपासून शरीफ राजीनामा देत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन करणार आहोत. आपल्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्या त्याच भावना आहेत.