मुंबईवरील २६/११ प्रकरणाचा मुख्य सुत्रधार झकी उर रहमान लख्वी याच्यासह त्याच्या सहा सहकाऱयांच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तानच्या न्यायालयाने नकार दिला. पाकिस्तान सरकारच्या वतीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात आरोपींच्या आवाजांच्या नमुन्यांसाठी अर्ज करण्यात आला होता तो न्यायालयाने फेटाळून लावला. पाकिस्तानकडून मुंबई हल्ल्यातील सर्वांवर खटले भरले आहेत, पण सज्जड पुरावे भारत देईल अशी आमची अपेक्षा आहे. भारताने अजून लख्वीविरोधात ठोस पुरावे दिलेले नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.

याआधीही २०११ साली लख्वीच्या आवाजाचे नमुने प्राप्त करण्यासाठी सरकारी पक्षाने पाक न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळून लावण्यात आला होता. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी लख्वी याला २०१४ साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची १० एप्रिल २०१५ रोजी तुरूंगातून सुटका करण्यात आली, तर लख्वीचे सहकारी अब्दुल वाहिद, मझहर इक्बाल, हमद अमीन सादिक, शाहीद जमील रियाज, जमील अहमद, युनूस अंजुम हे २६/११ हल्लाच्या कटात सामील असल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ अदियाला तुरुंगात आहेत. २००८ मध्ये मुंबईत करण्यात आलेल्या हल्ल्यात १६६ जण मरण पावले होते.