फुटीरवादी हुíरयत संघटनेचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी सोमवारी पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बसित यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरमधील राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली.
मसरत आलमविरुद्धचे आरोप चुकीचे आहेत. न्यायालयाने आलमविरुद्धचे सर्व गुन्हे रद्द करून त्याची सुटका केली आहे. यापूर्वीही तो अनेकदा जामिनावर सुटून आला आहे. त्यामुळे  त्याची सुटका हा काही मोठा मुद्दा नाही, असे गिलानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कुठलेही सरकार सत्तेवर आले तरी जम्मू-काश्मीरमध्ये काही बदल घडून येणार नाही. मुफ्ती सईद यांनी हुर्रियतची केलेली प्रशंसा हा केवळ राजकीय स्टंट होता. जम्मू-काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश असून तो भारताचा भाग नाही, ही वस्तुस्थिती भारताने स्वीकारायला हवी, असे गिलानी म्हणाले.
दरम्यान, आलम याच्या सुटकेच्या मुद्दय़ावर विरोधी पक्षांनी चढवलेल्या हल्ल्याला उत्तर देताना, भाजप आणि पीडीपी यांच्यात ‘वैचारिक मतभेद’ असल्याचे सरकारने राज्यसभेत मान्य करून राष्ट्राच्या अखंडतेसाठी कुठलाही ‘त्याग’ करण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले. कुणी कितीही प्रभावशाली असला, तरी त्याला देशाची एकता आणि अखंडता यांच्याशी खेळण्याची मुभा दिली जाणार नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.