भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारताकडून आलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करावा, अशी शिफारस पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना केली आहे. ही संधी वाया घालविल्यास ती चूक ठरेल, असेही शरीफ यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने शिफारस केली असून शरीफ सकारात्मक निर्णय घेतील, अशी शक्यता एका ज्येष्ठ मुत्सद्दय़ाने वर्तविली आहे. हे निमंत्रण न स्वीकारल्यास ती चूक ठरेल, आपल्याला भविष्याकडे पाहण्याची गरज आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
शरीफ यांना निमंत्रण दिल्यानंतर ते त्याचा स्वीकार करतील की नाही यावरून भारतात जोरदार चर्चेला उधाण आले होते. दोन देशांमधील संबंध ताणलेले आहेत आणि मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान भेटीचे निमंत्रण स्वीकारले नव्हते. त्यामुळे जोरदार चर्चेला उधाण आले होते.