इराणला पाकिस्तानकडून अणुतंत्रज्ञान मिळाल्याची स्पष्ट कबुली इराणचे माजी अध्यक्ष अकबर हशेमी रफसंजानी यांनी दिली आहे. त्यामुळे इराण, लिबिया आणि उत्तर कोरियाला पुरविण्यात आलेले तंत्रज्ञान हे माजी अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान चालवत असलेल्या नकली प्रणालीतून पुरविण्यात आले होते. पाकिस्तानकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेला दावा कमकुवत झाला आहे.

इस्लाम जगताकडे अणुबॉम्ब हवा असे अब्दुल कादीर खान यांना वाटत होते. त्यामुळे पाकिस्तानने आम्हाला मदत करण्याची तयारी दर्शविली, असे रफसंजानी यांनी म्हटल्याचे इराणमधील एका अणूविषयक मासिकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. युद्धजन्यस्थिती होती त्यामुळे शत्रुपक्षाने अणुशस्त्राचा वापर केल्यास आपल्याकडे पर्याय उपलब्ध हवा, अशी आमची मानसिकता होती, असेही रफसंजानी म्हणाले.
खान यांनी बुशेहर अणू प्रकल्पाला १९८६ मध्ये भेट दिली तेव्हा एक्यू खान प्रणालीने इराणला त्यांच्या पी-१ पद्धतीच्या अल्युमिनियम-रोटोर सेंट्रिफ्यूजची रचना पुरविली होती, असा संशय आहे. त्यानंतर १९९४ ते १९९६ या कालावधीत इराणला ५०० सेंट्रिफ्यूजचे घटक पुरविण्यात आले ते अतिप्रगत पी-२ पद्धतीच्या सेंट्रिफ्यूजचे होते आणि त्याचा वापर २००२ मध्ये सुरू झाला.
इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे मान्य केले की १९९४ ते १९९६ या कालावधीत आम्ही गुप्तपणे १३ वेळा भेटलो. अणुकरार करण्यासाठी आपण व्यक्तिश: पाकिस्तानला गेलो होतो, असे रफसंजानी म्हणाले. १९७९ च्या क्रांतीमुळे इराणला जर्मनीकडून मिळणारे तांत्रिक सहकार्य थांबले, त्यानंतर आम्ही पाकिस्तानशी चर्चा सुरू केली. पाकिस्तानचे शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांना भेटण्यासाठी आपण पाकिस्तानचा दौरा केला. मात्र आपल्याला त्यांची भेट घेण्यात येऊ दिली नाही.
इराणचे खोमेनी यांनीही पाकिस्तानचा दौरा केला, मात्र त्यांनाही यश लाभले नाही, असेही ते म्हणाले. रफसंजानी यांनी जो कालावधी सांगितला त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, इराण आणि पाकिस्तान यांच्यातील अणुसहकार्याला माजी लष्करशहा जन, मोहम्मद झिया-ऊल-हक यांनी मंजुरी दिली होती. इराणच्या तीन अधिकाऱ्यांनी खान यांच्या प्रणालीतील सदस्यांची १९८७ मध्ये भेट घेतली होती. त्यामध्ये श्रीलंकेतील व्यापारी मोहम्मद फारूक आणि बुहारी सय्यद अली ताहीर आणि जर्मनीचा अभियंता हेन्झ मेबूज यांचाही समावेश होता. या व्यक्तींनी इराणला एका पानाची हस्तलिखित प्रत दिली आणि त्यामध्ये सेंट्रिफ्यूज, तांत्रिक नकाशे आणि २००० यंत्रांचे सुटे भाग देण्याचा प्रस्ताव नमूद करण्यात आला होता. त्यानंतर एका ११ पानांच्या पत्रात म्हटले होते की, तीन अणुबॉम्बसाठी इराणने १० अब्ज डॉलरचा प्रस्ताव ठेवला होता.
या कराराचा पाठपुरावा इराणचे उच्चपदस्थ अधिकारी अली समखानी यांनी १९९० मधील इस्लामाबाद भेटीत केला होता आणि पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याशी चर्चा केली होती.

इस्लामी जगताकडे अणुबॉम्ब हवा असे अब्दुल कादीर खान यांना वाटत होते. त्यामुळे पाकिस्तानने आम्हाला मदत करण्याची तयारी दर्शविली.
-अकबर हशेमी रफसंजानी,
इराणचे माजी अध्यक्ष