पाकिस्तानचा अण्वस्त्र निर्मितीचा वेग पाहता येत्या २०२५ सालापर्यंत पाकिस्तानकडे साधारण २५० अण्वस्त्रे जमा होतील आणि तो जगातील पाचव्या क्रमांकाचा अण्वस्त्रधारी देश बनेल, असा अहवाल एका अमेरिकी थिंक-टँकने (वैचारिक गटाने) मांडला आहे.

द बुलेटिन ऑफ अ‍ॅटॉमिक सायंटिस्ट्सच्या हॅॅन्स क्रिस्टनसेन आणि रॉबर्ट नॉरिस यांनी ‘पाकिस्तानी न्युक्लिअर फोर्सेस २०१५’ या शीर्षकाचा अहवाल नुकताच लिहिला आहे. त्यानुसार पाकिस्तानकडे २०११ साली ९० ते ११० अण्वस्त्रे होती. त्यांची
संख्या वाढून आतापर्यंत
११० ते १३० झाली आहे. याच वेगाने त्यांची संख्या वाढत
राहिली तर सन २०२५ पर्यंत पाकिस्तानकडे २२० ते २५० अण्वस्त्रे असतील, असे या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये यापूर्वीच असलेल्या युरेनियम शुद्धीकरण करणााऱ्या अणुभट्टय़ा आणि नव्या चार प्लुटोनियम अणुभट्टय़ा यामुळे तेथील अणुइंधनात वेगाने भर पडत आहे. पाकिस्तानचा अण्वस्त्रे बनवण्याचा आणि ती डागण्यासाठी लढाऊ विमाने घेण्याचा आणि क्षेपणास्त्र विकसित करण्याचा वेगही चांगलाच आहे. त्यामुळे पाकिस्तान येत्या दशकात जगातील पाचव्या क्रमांकाचा अण्वस्त्रधारी देश बनू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.
आगामी काळात पाकिस्तान किती अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तैनात करतो आणि भारताचा अण्वस्त्रांचा साठा किती वेगाने वाढतो, याकडे लक्षात घेण्यासारख्या बाबी असतील या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
पाकिस्तान मध्यम व दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शहीन १-अ आणि शहीन-३ ही लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे, बाबर (हत्फ-७) हे क्रूझ क्षेपणास्त्र आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकणारे राद (हत्फ-८) हे क्षेपणास्त्र विकसित करत आहे.
तसेच पाकिस्तानने २०१२ साली नौदलातही अण्वस्त्रे हाताळणारे दल स्थापन केले आहे.

‘अमेरिकेबरोबर अणुकराराविषयी चर्चा नाही’
पीटीआय, वॉशिंग्टन – अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत नागरी अणुकराराविषयी चर्चा होणार नसल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव ऐझाज अहमद चौधरी यांनी दिले. उभय देशांत या भेटीदरम्यान अणुकरारावर चर्चा होण्याची अटकळ आंतरराट्रीय स्तरावर बांधली जात होती. त्या संदर्भात पाकिस्तानने हा खुलासा केला आहे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानची अण्वस्त्रे आणि त्यांची सुरक्षा यांच्याबाबत चर्चा सुरू आहे आणि ती पुढेही होत राहील. अमेरिकेने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवरील नियंत्रणाबाबत समाधान व्यक्त केले आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
तसेच काही दिवसांपूर्वी आपणच केलेले वक्तव्य त्यांनी नाकारले. पाकिस्तानच्या लहान अण्वस्त्रांमुळे भारताला अचानक आणि मर्यादित स्वरूपाचे आक्रमण करणे अवघड होईल, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानच्या याच लहान अण्वस्त्रांमुळे भारतीय उपखंडात नवी अण्वस्त्रस्पर्धा वाढीस लागून शांततेला बाधा पोहोचेल, अशी चिंता अमेरिकेकडून व्यक्त केली जात आहे.