किरगिझस्तानाची राधानी बिश्केक या ठिकाणी शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया, पाक पुरस्कृत दहशतवाद हे मुद्दे समोर आले. पाकिस्तानने दहशतवादमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत असं भारताला वाटतं. मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितलं. पाकिस्तानच्या कुरापती आणि दहशतवादी कारवाया यांच्याविरोधात भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे हेदेखील मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितलं.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या भेटीविषयीची माहिती दिली. चीन आणि भारत या दोन्ही देशांमधले संबंध दृढ व्हावेत अशी अपेक्षा आहे. अनौपचारिक भेटीसाठी आपण भारतात या असं निमंत्रण मोदी यांनी शी जिनपिंग यांना दिलं आहे. यावर्षी भारत आणि चीन संबंधांची ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने दोन्ही देशांदरम्यान ७० कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. ज्यापैकी ३५ कार्यक्रम भारतात तर ३५ कार्यक्रम चीनमध्ये ठेवण्याचा विचार आहे असेही गोखले यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही देशांच्या नेत्यांची भेट झाली आहे. मोदींच्या विजयाबद्दल त्यांना चीनच्या राष्ट्रपतींनी शुभेच्छा देखील दिल्या. बिश्केक येथे होत असलेल्या एससीओ शिखर संमेलनात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील सहभागी होणार आहेत. भारताने अगोदरच स्पष्ट केले आहे की, दहशतावाद्याविरोधात कारवाई केली जात नाहीत तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कोणतीही औपचारिक चर्चा होणार नाही. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.