विजेच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी पाकिस्तानने कराची शहराजवळ दोन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. सिंध पर्यावरण संस्थेने या प्रकल्पाला मान्यता दिली असून तो पॅराडाइज पॉइण्ट येथे उभारण्यात येणार आहे, असे ‘डॉन’ने म्हटले आहे.
सदर प्रकल्प कराची शहराच्या जवळ असल्याने विविध नागरी संस्थांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्यामधून बाहेर पडण्याच्या योजनांचाही अभाव असल्याचे संस्थांचे म्हणणे असले तरी त्याकडे पाकिस्तान सरकारने दुर्लक्ष केले आहे.
कराचीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पॅराडाइज पॉइण्ट असून तो भूकंपप्रवण आणि असुरक्षित आहे. गेल्या दोन दशकांत कराचीच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली असून ती २० दशलक्षांहून अधिक झाली आहे. के-२ आणि के-३ हे प्रत्येकी ११०० मेगाव्ॉटचे दोन अणुऊर्जा प्रकल्प चीनमधील कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येणार असून, पाकिस्तान अणुऊर्जा आयोग ही सरकार संस्था त्यामध्ये सहभागी होणार आहे. या दोन प्रकल्पांबाबत नागरी गटांनी जाहीर चिंता व्यक्त केली आहे. सदर प्रकल्प शहराच्या जवळ आहेत, केवळ पाच कि.मी.पर्यंतची मर्यादा अणुऊर्जा आयोगाने आखलेली असली तरी आण्विक किरणोत्सर्गामुळे संपूर्ण शहराला धोका असल्याचे संस्थांचे म्हणणे आहे.