भारताच्या दोन जेट विमानांनी पंजाब प्रांतात पाकिस्तानच्या हवाई हद्दीत तीन मैल आतमध्ये प्रवेश केल्याने पाकिस्तानला प्रतिकार करावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. लाहोरपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या पाकपट्टन येथे हा प्रकार घडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.भारताच्या दोन जेट विमानांनी अट्टरी, फाजिल्का क्षेत्रात प्रवेश केला आणि तेथे ही विमाने जवळपास दोन मिनिटे घिरटय़ा घालत होती. त्यामुळे पाकिस्तान हवाई दलास त्यांचा प्रतिकार करावा लागला, असे पाकिस्तान हवाई दलाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या हवाई दलाने तातडीने प्रतिकार केल्याने भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून बाहेर पडणे भाग पडले, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.
दरम्यान, लढाऊ जेट विमानांची नियमित प्रशिक्षण चाचणी सुरू असताना ती सीमेजवळून गेली असण्याची शक्यता आहे, असे स्पष्टीकरण भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. तथापि, हे तांत्रिक स्वरूपाचे उल्लंघन असून त्याची कल्पना पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले.